सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी/ अमोल येलमार : भोसरी विधानसभेत आमदार महेश लांडगेविरुद्ध माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यात दुरंगी आणि चुरशीची लढत होत आहे. आमदार लांडगे यांनी विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, तर गव्हाणे यांनी प्रलंबित प्रश्न आणि परिवर्तन यांवर भर दिला आहे. भोसरीचे मैदान सलग दोनवेळा सहज मारल्यानंतर आता तिसऱ्या वेळी भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्यासमोर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांनी कडवे आव्हान दिले आहे.
शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ. २००९ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्यांदा विलास लांडे अपक्ष निवडून आले. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही महेश लांडगे अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपशी घरोबा करून २०१७ मध्ये त्यांनी कमळ हाती घेतले. २०१९ मध्ये लांडगे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे लढलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासोबत लांडगे, माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे असतानाही केवळ ९ हजार ५७२ इतक्याच मतांचे अधिक्य आढळराव यांना मिळाले होते.
गव्हाणे यांच्यासोबत भोसरीतील पूर्ण राष्ट्रवादी
महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपकडे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने विधानसभा लढविण्यासाठी गव्हाणे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता माजी आमदार लांडे यांच्यासह भोसरीतील पूर्ण राष्ट्रवादी गव्हाणे यांच्यासोबत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे रवी लांडगे आणि गव्हाणे यांच्यात रस्सीखेच झाली होती. हा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळाला आणि गव्हाणे यांनाच उमेदवारी मिळाली. रवी लांडगे यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले. भोसरीत शिवसेनेची मतपेढी असून, त्याचा गव्हाणे यांना फायदा होईल असा अंदाज आहे.
लांडगे सलग दोनदा विजयी
तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्यावरील नाराजांची मोट बांधून २०१४ मध्ये अपक्ष आणि २०१९ मध्ये भाजपकडून, असे सलग दोनदा लांडगे विजयी झाले. दोन्ही वेळेस त्यांनी लांडे यांचा पराभव केला. सन २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात लांडगे यांनी मोठी भूमिका बजावली होती. महापालिकेत सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावातील नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौर केले. लांडगे यांच्याकडून दहा वर्षांत केलेला विकासाचा मुद्दा मांडला जात आहे. समाविष्ट गावांत झालेली कामे त्यांच्याकडून प्राधान्याने सांगितली जात आहेत. तर, रखडलेली कामे आणि परिवर्तन याच्यावर गव्हाणे यांनी भर दिला आहे.
असा आहे मतदारसंघ
-पुरुष मतदार : ३,२८,२८०
-महिला मतदार : २,८०, ०४८
-तृतीयपंथी – ९७
-एकूण मतदार : ६,०८,४२५