पुणे – लोकसभा निवडणूकीमुळे राज्यातील राजकारण रंगले आहे. प्रचाराला देखील जोर आला असून आज महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज पुण्यामध्ये राजकीय व्यक्तींची मांदियाळी आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्य वक्तव्याचा निषेध करत अजित पवार हे दिल्लीवर आलेले भाषण वाचून दाखवतात असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र वाढले आहे. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बाहेरचे म्हटले होते. यावर सुनेत्रा पवार या भावुक देखील झाल्या होत्या. यावरुन राजकारण रंगल्यानंतर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “दादांना विषयच समजला नाही. पवार कुटुंबीयाने नेहमी पुरोगामी विचार मनामध्ये ठेवला आहे. शरद पवार गेली साठ वर्षे प्रतिगामी विचारांविरोधात लढत आहेत. अजित दादा स्वतः तीस वर्षे भाजपाच्या विचारा विरोधात लढत होते. आता राजकीय दृष्टीकोनातून कुटुंब पाहिलं तर जो विचार आम्ही सर्वांनी जपला त्या विचारांविरोधात अजित दादा गेले. तसे राजकीय दृष्टीकोनातून ते आता बाहेरचे झाले आहेत. विचारांमधला हा फरक साहेबांनी सांगितला. परंतु, अजित पवारांनी हे प्रकरण वेगळ्या पातळीवर नेलं,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
पुढे रोहित पवार म्हणाले, द्रौपदीचं उदाहरण द्यायचं काय कारण होतं? महिलांचा अवमान झाला. दादा आता जेवढे भाषण करतील त्यांचा भाषणावरचा तोल सुटत जाईल. मुंबई – दिल्लीवरून त्यांना भाषणं येतात, ते भाषण दादा वाचतात. वाचण्याच्या नादात दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपा करते”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला.