संग्रहित फोटो
बारामती नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आल्याने प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच थांबला होता. या निर्णयामुळे उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचारासाठी मोठा खर्च करूनही निवडणूक लांबल्याने अनेक उमेदवार आर्थिक ताणात सापडले, तर बारामतीकरांमध्येही उत्साह ओसरलेला दिसून आला.
भेटीगाठी, संवाद, स्थानिक प्रश्नांवर चर्चा सुरू
निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यानंतर शहरात काही काळ शांतता पसरली होती. प्रचार कार्यालयांमध्ये कमी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी, आणि गल्लीबोळांतून फिरणारे प्रचार वाहनही गायब झाले होते. उमेदवार व कार्यकर्ते ‘आता पुढे काय?’ या संभ्रमात होते. वाढलेल्या मुदतीमुळे संभाव्य खर्च वाढणार, ही भीती अनेकांच्या मनात घर करून होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बारामतीत पुन्हा एकदा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार पुन्हा जोमाने मैदानात उतरले आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये कोपरा सभा, घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठी, नागरिकांशी थेट संवाद, तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, वाहतूक, आरोग्य व विकासकामे हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू असून, व्हिडीओ संदेश, लाईव्ह संवाद, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि फेसबुक पोस्टद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. तरुण कार्यकर्ते डिजिटल प्रचारात आघाडी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षीय ध्वज, बॅनर, प्रचार साहित्य पुन्हा शहराच्या रस्त्यांवर झळकू लागले असून, वातावरण पुन्हा तापले आहे. एकीकडे वाढलेल्या खर्चाची चिंता असली, तरी निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास आणि मतदारांशी नाते घट्ट करण्याचा प्रयत्न उमेदवार करताना दिसत आहेत. येत्या दिवसांत प्रचार आणखी रंगतदार होणार असून, बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा शिगेला पोहोचली आहे.






