संग्रहित फोटो
शिक्षक परिषदेचे कार्यवाह माजी सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुधीर विसापुरे यांची उमेदवारी सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे. समाजाला रचनात्मक दिशा देणारा शिक्षकच समाज घडवतो, सातारा पुन्हा नव्याने घडवण्यासाठी माझा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज आहे, असा त्यांचा दावा आहे. भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद अमोल मोहिते यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. म्हणून मिलनात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वादाची कितीही भांडी वाजली तरी भाजप म्हणून सर्व नगरसेवकांना तसेच भाजपच्या प्रचार यंत्रणेला ही लढत प्रतिष्ठेची करून अमोल मोहितेच नगराध्यक्ष होतील यासाठी पायाला भिंगरी लावावी लागणार आहे. अमोल मोहिते यांच्या संपर्क यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी निष्ठावंतांना डावल्याची भावना तीव्र करत महाविकास आघाडीचा रस्ता पकडला. सक्षम असूनही उमेदवारांना नाकारले जाणे हे अत्यंत त्रासदायक होते त्यामुळेच आपली साताऱ्याच्या भविष्यासाठी उमेदवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा पालिकेला टक्केवारीच्या राजकारणापासून दूर ठेवणे, शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरण, शहराला पर्यटनाचा केंद्रबिंदू बनवणे, शहरातील पार्किंग व अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा, समाजकारण व राजकारणातील गुन्हेगारीला प्रशासनाच्या सहकार्याने पायबंद घालणे, या मुद्द्यांवर सुवर्णा पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे .
रणांगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
यंदाची निवडणूक कोणत्याही जाहीरनाम्याशिवाय सुरू झाली, हा सुद्धा एक आश्चर्याचा विषय आहे. २१ तारखेनंतर रणांगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापुढील १० दिवसांमध्ये जोरदार प्रचाराचा धुरळा उडणार आहे. यामध्ये सातारा पालिकेत विशेषता प्रशासकीय कालावधीत झालेल्या अनेक विकास कामांची राजकीय संदर्भाने पोलखोल होणार आहे. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा बाबाराजे गटाचा असल्यामुळे शिवेंद्रसिंहराजे मोठी ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी सुद्धा तितक्याच ताकतीने रणांगणात आहे. या दोन्ही आघाड्यांचे आव्हान महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पेलावे लागणार आहे.
साताऱ्यात महिला मतदारांची टक्केवारी अधिक
सातारा शहरांमध्ये एकूण १ लाख ४८ हजार १०९ मतदार १५६ मतदान केंद्रावरून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत .सातारा शहरात ७३ हजार ७४५ पुरुष असून, महिला मतदारांची संख्या ७४ हजार ३३१ इतकी आहे. महिला मतदारांचा टक्का जास्त असल्याने लाडक्या बहिणी मतदानासाठी जास्तीत जास्त कशा बाहेर पडतील, या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची राजकीय रणनीती असणार आहे. एकूण मतदार राजांचा आढावा घेतला असता, १८ ते २५ वयोगटातील मतदारांची संख्या सातारा शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये २९. ६ इतकी आहे. हा मतदानाचा टक्का शहराच्या राजकारणासाठी निर्णायक असणार आहे. शहराच्या हद्दवाढ भागात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. तब्बल ६० हजार १६६ लोकसंख्या आहे, त्यामुळे हा आकडा सुद्धा शहराच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.
शाहूपुरी मध्ये अपक्षांचा बोलबाला
शाहूपुरी आणि शाहूनगर तसेच खेड ग्रामपंचायत कार्यक्षेत्राचा महामार्गाच्या अलीकडील भाग तेथे पहिल्यांदाच नगरसेवक निवडून जाणार आहे. शाहूपुरी मध्ये अपक्षांचा बोलबाला आहे व महामार्ग लगतचा भाग हा प्रभाग क्रमांक १६ जोडला गेल्याने तेथे सातारा विकास आघाडीचे अॅड. दत्ता बनकर, प्रभाग क्रमांक १७ मधून नगर विकास आघाडीचे फिरोज पठाण आणि १९ मधून शेखर मोरे पाटील ही दिग्गज नावे रिंगणामध्ये आहेत .शाहूपुरीमध्ये प्रभाग क्रमांक १० मध्ये बाबाराजे समर्थक विश्वतेज बालगुडे व प्रभाग क्रमांक ९ मधून उदयनराजे समर्थक संजय पाटील हे अपक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढती लक्षवेधक होतील, असा राजकीय अंदाज आहे.






