Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने अमरावती विभागात राबविलेल्या विशेष गुणनियंत्रण मोहिमेत राज्यातील सर्वाधिक मोठी आणि प्रभावी कारवाई केली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२० कृषी केंद्रांवर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले, तर २३० कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय २३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून १ कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचे बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.(फोटो सौजन्य – AI)
दुष्काळी यवतमाळात आढळला समृद्ध वारसा! दिग्रसनजीक उत्खननातून मिळाली ३ हजार वर्षापूवींची मानवी वस्ती
खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बनावट मालाच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक थांबावी, यासाठी कृषी विभागाने संपूर्ण विभागात व्यापक धाडसत्र राबविले. कृषी केंद्रांमधून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासण्यात आली. तपासणीत निकृष्ट किंवा नियमबाह्य माल आढळताच संबंधित विक्रेत्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात आली.
यंदाच्या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच रेल्वे आणि खाजगी प्रवासी बसमधून पाठविल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठांच्या खेपांवरही करडी नजर ठेवण्यात आली. या माध्यमातून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या संशयित बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.उद्दिष्ट्यापेक्षा अधिक कृषी केंद्रांची तपासणी विभागात एकूण २२ हजार ३२३ कृषी केंद्रांपैकी ४ हजार ८९८ केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, कृषी विभागाने ५ हजार ६१ केंद्रांची तपासणी करून लक्ष्यापेक्षा अधिक कारवाई केली.
अवैध कृषी निविष्ठांच्या पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून अशा व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यापक आणि धडक मोहिमेमुळे अमरावती विभागाने बनावट कृषी निविष्ठांविरोधातील कारवाईत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कठोर आणि सातत्यपूर्ण मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.






