लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पोलीस तपासणी नाक्यावर एका चार चाकी गाडीत दहा लाखांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थिर सर्वेक्षण पथक (एस.एस.टी.) आणि पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास केलेल्या तपासणीत ही रक्कम आढळली आहे.
दरम्यान, ही रक्कम बांधकाम व्यवसायातील असल्याचा दावा संबधित व्यावसायिकाने केला आहे. मात्र, याची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, रक्कम बेहिशोबी असल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका चारचाकीची तपासणी फोंडाघाट तपासणी नाक्यावर मंगळवारी पोलिसांनी केली. त्यावेळी त्या गाडीमध्ये १० लाखांची रक्कम आढळून आली. पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी पुढील कारवाईसाठी एसएसटी विभागाचे प्रमुख यांच्या ताब्यात ती रक्कम दिली. यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, बाणे, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस शिपाई सचिन माने, किरण मेथे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. मात्र, ही एवढी मोठी रक्कम का आणण्यात आली? ती कुठे घेऊन जाणार होते? याची कसून तपासणी सुरू असून लवकरच त्याबाबतची माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. आयकर विभागाच्या पथकालाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.