सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर कॉंग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली असून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपादवरून उचलबांगडी करुन हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी आमदार अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची, सचिव पदी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी आमदार अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
“विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून, जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्वाची भूमिका बजावतील” असे सांगून प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसची जोरदार तयारी सुरु
विधानसभा निवडणुकीनंतर आता महानगरपालिका आण नगरपालिकांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. २०२५ मध्ये कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठका आणि संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. विधानसभा निवडणुकीतनंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. पण आता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली आहे.
हे सुद्धा वाचा : तीन दिवस उपाशी, हातात कीटकनाशकाची बाटली अन्…; नराधम गाडेला कसं पकडलं?