रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या टंचाईचे सावट असून उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संतुलित खतवापर, सेंद्रिय पर्यायांचा अवलंब आणि माती परीक्षणाच्या आधारे पीक पोषण व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढविणे शक्य असल्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. वर्धा जिल्ह्यात गतवर्षी करण्यात आलेल्या माती नमुना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्र (नायट्रोजन) घटकाचे प्रमाण कमी, स्फुरद (फॉस्फरस) मध्यम, तर पालाश (पोटॅशियम) जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जमिनीचे आरोग्य आणि दीर्घकालीन उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य – AI)
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल, मातीचे आरोग्य टिकून राहील तसेच पिकांचे रोगांपासून संरक्षणही होऊ शकेल. विशेषतः नत्रयुक्त रासायनिक खतांच्या वापरात पर्यायी खतांचा वापर वाढवावा, यामध्ये सेंद्रिय खत, हिरवळीचे खत, जैवखते (बायो-फर्टिलायझर्स), तसेच नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जैविक खतांची बीजप्रक्रिया यांचा समावेश करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक विविध जैविक खतांची उपलब्धता जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, सेलू येथे करून देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून ‘जमीन आरोग्य पत्रिका’च्या आधारे विद्यापीठांच्या शिफारशीनुसार संतुलित खतांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.
८ शेतकऱ्यानी आपल्या शेतातील माती परीक्षण करून घ्यावे, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,- अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, यांनी व्यक्त केली आहे.






