मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात शिवसेना पक्षफुटीनंतर अनेक नेतेमंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेली. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची शिंदे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे. त्यांच्याच बाबत एक बातमी समोर आली आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीपूर्वी संतोष बांगर यांनी ‘कळमनुरीत 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही’, असे म्हटले होते. पण कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला असून, 17 पैकी फक्त 5 जागा निवडून आणण्यात संतोष बांगर यांना यश आलं आहे. त्यामुळे आता यावरूनच ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी त्यांना त्यांच्याच आव्हानाची आठवण करत ‘मिशा कधी काढणार?’, असा टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते बांगर?
आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीत. कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. 17 पैकी 17 जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर या मिशा ठेवणार नाही’, असे त्यांनी म्हटले होते.
अयोध्या पौळ काय म्हणाल्या?
दोन दिवसांपूर्वी मी हिंगोली दौऱ्यावर होते. जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हा माझ्या लाडक्या दादुड्यानं पळ काढला. मी नागनाथाच्या मंदिरात जेव्हा गेले तेव्हाही त्यानं पळ काढला. समोर येण्याची हिंमत करत नाही. माझा दादुड्या. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही, असेही पौळ यांनी सांगितले.