संग्रहित फोटो
पुणे : राजू शेट्टी, महादेव जानकर व मी एकत्र आलो आहोत, आता लोक एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा हादरा बसेल, असा विश्वास माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी कडू पुण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गर्भवती महिला भिसे यांचा मृत्यू हा सामूहिक गुंडागर्दीचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींसह कायद्यातील कलम १२० ब नुसार सर्वांना अटक केली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कारवाई केली तरच ते जाणदार ठरतील, असंही यावेळी कडू म्हणाले.
बीडमधील आत्महत्या, अपहरण, मारहाण पाहता बीड चा बी व बिहारचा बी ही ‘बी- बी’ संस्कृती रुजायला लागली आहे. अशी टीका कडू यांनी करून, आता तेथे जिल्हाधिकारी म्हणून एखाद्या ब्रिगेडियरलाच नियुक्त करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचे बीडकडे लक्ष नाही. बीड सारख्या जिल्ह्यात खालच्या स्तरावर जाऊन काम करायला त्यांना वेळ नाही किंबहुना काम करायची इच्छा नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महादेव जानकर नेमकं काय म्हणाले?
आमच्या तीनही पक्षांकडून शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी, राष्ट्रीय समाजासाठी काम चालू आहे. या सर्व कामाचा मध्यबिंदू काढून समान विचारधारणा घेऊन पुढे जाणार आहोत. सध्या विरोधी पक्षात ठाकरेंची सेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पण अजूनही विरोधी पक्षांनी पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही म्हणजे राजू शेट्टी, बच्चू कडू व मी एकत्र आलो असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना जानकर म्हणाले, महात्मा फुले यांच्या विचारांवर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली आहे. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष, कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष व आमचा राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र आलो आहे. ही एकी सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आहे. आम्ही यातून देशात राज्यात सुरू असलेल्या असंतोषाचे जनक बनणार आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे ला दिल्लीतील तालकोतरु मैदानावर मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त होळकर यांच्या जन्म गावातून म्हणजेच चोमडी येथून काल रथयात्रा सुरू झाली आहे. ही रथयात्रा मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा मार्गाने दिल्लीला पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान आमच्या पक्षाची विचारधारा सांगितली जाणार आहे. असंही जानकर म्हणाले. तसेचं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते एकत्र आले तर चांगलेच आहे असे यावेळी जानकर यांनी सांगितले