सोलार प्रकल्प रद्द करण्यासाठी बलगवडे ग्रामस्थ आक्रमक; गुरुवारपासून करणार आमरण उपोषण
तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनी गायरान गट क्रमांक 180 आणि 182 मधील सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि प्रस्तावित सोलार प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
उपोषणकर्त्यांमध्ये माजी सैनिक व शेतकरी आंदोलक जोतिराम जाधव, हरिराम पाटील, श्रीकांत मोहिते, निवास पाटील, ऋषिकेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन तासगाव तहसील कार्यालयात उपोषणकर्त्यांकडून देण्यात आले.
ग्रामस्थांच्या मते, सदर गायरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केलेली असून, सोलार प्लांट उभारणीसाठी संबंधित कंपनीकडून वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे आक्षेप नोंदवून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे प्रकल्पाला विरोध दर्शविला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंपनीकडून जबरदस्तीने झाडे तोडली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : “मी माझा जीव देईन पण झाडे तोडू देणार नाही…”,नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याविरुद्ध सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका
विरोधाची तीव्रता वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा टप्पाही ठरवला आहे. यामध्ये 12 डिसेंबरला गावबंद आंदोलन, 13 डिसेंबरला मुंडन आंदोलन, 14 डिसेंबरला भिवघाट–तासगाव–बलगवडे फाटा येथे रास्ता रोको केला जाणार आहे. तर 15 डिसेंबरपासून सोलार प्रकल्पाच्या कामाला ठाम विरोध करण्यासाठी ‘कार्य-बंद’ आंदोलन केले जाणार आहे.
सोलार प्रकल्प संपूर्णपणे रद्द केल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य किसान सभा व महिला आघाडी यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
नाशिकमध्येही वृक्षतोडीला तीव्र विरोध
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान तपोवनातील साधुग्राम स्थळी सुमारे १८०० झाडे तोडल्याबद्दल मोठा गोंधळ उडाला आहे. शहरातील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संघटना निषेधार्थ बाहेर पडल्या आहेत. दरम्यान, चित्रपट अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे हे देखील नाशिकमध्ये आले आणि त्यांनी तोडण्याविरुद्ध आवाज उठवला. नाशिकच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि झाडे वाचवण्यासाठी ते पुढे आले आहेत.






