बीड : परळीत सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत आहेत का ? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परळी नगरपालिकेने शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी, घरपट्टी यासारखा टॅक्स भरावा.असा मजकूर टाकून परळी शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावत बॅनरबाजी केली आहे. तर याच बॅनरबाजी विरोधात आणि नोटीस विरोधात परळीकर मात्र आक्रमक झाले आहेत. नगरपालिकेला जशास तसे उत्तर देत परळीकरांनी देखील नगरपालिकेच्या बॅनरखाली पोस्टर लावत, अगोदर पाणी द्या, नाल्या काढा, काढलेल्या नाल्या उचला, पायाभूत सुविधा द्या आणि नंतरच टॅक्स मागायला या, अशा आशयाचे पोस्टर परळीकरांनी शहरात लावले आहेत.
दरम्यान परळीच्या नागापूर वान धरणामध्ये 60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील नगरपालिका वेळेवर पाणी सोडत नाही. यामुळे पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकंती करावे लागते आहे. नाल्या काढल्या जात नाही, काढलेल्या नाल्या वेळेवर उचलल्या जात नाहीत, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अगोदर नगरपालिकेने आम्हाला पायाभूत सुविधा द्याव्यात आणि नंतरच टॅक्स मागायला यावं. असं आव्हान परळीकरांनी नगरपालिकेला दिलं आहे.
दरम्यान मुंडेंच्या परळी शहरात पायाभूत सुविधासाठी कोट्यावधीचा खर्च केला जात आहे. कागदोपत्री आकडे मोठमोठे पाहायला मिळतात. मात्र परळीकरांना खरचं सुविधा मिळतात का ? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.