भाजपमध्ये संघटनात्मक बदल; जिल्हाध्यक्षांच्या यादीत बीडचा समावेश नाही
मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले आहेत. यानुसार, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यां करण्यात आल्या असून त्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच राज्यभरातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत.
या यादीत बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा सातत्यान राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. बीडमधील गुन्हेगारीचे प्रकार समोर येत असल्यामुळे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदावरील रिक्तता कायम ठेवण्यात आल्याने अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यतच पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक नेत्यांमधील संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या रणनीती पाहता, ही नियुक्ती पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपने कोणचीही निवड न करण्यामागे मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यातील वादही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील वाद कधीही लपून राहिलेला नाही. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यावेळीही सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात मंडळ अध्यक्षाची निवड करण्यात आल नाही. त्यानंतर भाजपच्या हायकमांडने संपूर्ण राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. मात्र बीडमध्ये अध्यक्षपदाची निवड थांबवण्यात आली. त्यामुळे बीडचा जिल्हाध्यक्ष नियुकती रखडण्यामागे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर स्थानिक कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर मस्के यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या जागी काही काळासाठी शंकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पक्षाकडून नव्या जिल्हाध्यक्षपदाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्यामुळे बीड जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. भाजपची आगामी रणनीती काय असेल आणि जिल्हाध्यक्षपदाची सूत्र कोणाकडे दिली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतेमंडळींचा प्रभाव आणि निवडणुकीच्या तयारीचा विचार करता ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.