आज राज्यभरात सकाळी 7 वाजल्यापासून सर्वत्र मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी मतदान सुरुळीत होत असताना काही ठिकाणी मारहाणीच्या घटना समोर येत आहे. बीडमधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अॅड माधव जाधव हे बुथ पाहणीसाठी गेले असताना तेथील धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जबरदस्त मारहाण केली आहे. या घटनेमुळे बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर बीडमधील घाटनांदूर या मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण
आज दुपारी 12 च्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अॅड माधव जाधव हे बुथ पाहणीसाठी परळीतील बॅंक कॉलनी परिसरात गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या धनंजय मुंडे समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. जाधव यांना चारही बाजूने घेरत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार मारहाण केल्याची दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र तेथील पोलिस प्रशासनाने त्यावेळी तात्काळ हस्तक्षेप केला नाही असा आरोप केला जात आहे. यानंतर घाटनांदूर मतदान केंद्राची तोडफोड केली गेली असून त्या परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
View this post on Instagram
A post shared by Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@ncpspeaks)
धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख
परळी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून मंत्री धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख अशी लढत होत आहे. शरद पवार यांनी परळीच्या जागेवर विशेष लक्ष दिल्याने येथे दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यावेळी पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ असल्याने मुंडे परिवारांच्या मतांमध्ये विभाजन होणार नाही. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातच जरांगे फॅक्टर चालला होता त्यामुळे पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता.या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरुद्ध मोठी मोहिम हाती घेतली आहे. त्याशिवाय जरांगे फॅक्टर ही बीडच्या राजकारणात असल्याने परळीमधील लढत ही चुरशीची होणार आहे.
परळी मतदारसंघ मुंडे कुटुंबियांचा गड
परळी मतदारसंघ हा मुंडे कुटुबिंयाचा गड मानला जातो. गोपीनाथ मुंडेंचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात 2009 आणि 2014 मध्ये पंकजा मुंडे निवडून आल्या होत्या. 2014 मध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विजय मिळवला होता तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर 30 हजाराहून जास्त मतांनी विजय मिळवला होता. 2024 लोकसभा निवडणुकीमध्येही या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना लीड मिळाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मतदारसंघात पारडे जड वाटत असले तरी विधानसभेची समीकरणे बदलतात त्यामुळे या मतदारसंघात काटे टक्कर आहे.