मंगळवेढा : छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील मोहिमेवर जाताना 358 वर्षापूर्वी मंगळवेढ्यात त्यांनी सात दिवस मुक्काम केला होता. येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड होत आसल्याने भविष्यात या किल्ल्याचा इतिहास लोप पावन्याची शक्यता निमार्ण होत असल्याने त्याच्या दुरूस्तीची गरज असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
पुरातत्व विभागाकडे त्याचा ताबा आसल्याने अन्य विभागाला दूरूस्तीसाठी निर्बंध येत आहेत. पुरातत्व विभाग कधीच इकडे पहात नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे. भुईकोट किल्ल्याचे जतन होत नसल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढ्यात चालुक्य, कलचुरी घराण्याची काही काळ राजधानी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळकीमुळे नेहमीच हे ठिकाण त्या काळात महत्त्वाचे मानले जात होते. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत आदिलशाहीविरुद्ध मोहीम काढली होती. येथील भुईकोट किल्ला व बाहेर 13 बुरूज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून 20 ते 27 डिसेंबर 1665 या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केला. विजापूरच्या जवळील किल्ला ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेरखानाला किल्ला उद्ध्वस्त करण्याची आज्ञा केली. पुढील काळात मंगळवेढा पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला. 1685 मध्ये औरंगजेबच्या बक्षीने उद्ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. सध्या किल्ल्याचे अवशेष उरले असून अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरल्याने किल्ल्याचे महत्त्व कमी झाले. आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्ले वजा गढी आहे. चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचा खंदक नष्ट झाला आहे.
ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीला पाहण्यास मिळेल का?
किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती, सप्त मातृकांची मूर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. परंतु सध्या बुरुजाची पडझड होत असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीस पाहण्यास मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. सद्या याच किल्यात प्रांत कार्यालय, भूमी आभिलेख कार्यालय, कारागृह आहे.