संग्रहित फोटो
सांगली : सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक व विकासासाठी नव्या, जुन्यांची मोट बांधून राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल राहिल. नवा, जुना असा भेदभाव होणार नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षाच्या वाढीसाठी ताकद देवू, पक्ष वाढवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख, मुन्ना कुरणे, जतचे युवा नेते तम्मनगौडा रवि पाटील, नीलेश येसुगडे यांच्यासह त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील क्रिकेट क्लब येथे कार्यक्रम झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नेते प्रफुल्ल पटेल, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश उपाध्यक्ष दिग्वीजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित होते.
प्रदेशाध्यश्र सुनिल तटकरे म्हणाले, संवेदनशील आणि जागृत जिल्ह्यातील आपण सर्व कार्यकर्ते पक्षात प्रवेश करता आहात. तुमच्या सर्वांची प्रश्न सोडवण्याची आणि विकासाची हातोटी अनुभवली आहे. ती यापुढेही कायम ठेवा. निशिकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संग्राम जगताप, रणधीर नाईक, अभिजित नाईक, अनिल पाटील, निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीरंग कदम, संभाजी यमगर, नरेंद्र दीक्षीत, बापुराव पाटील, उदय लाड यांच्यासह खानापूर, आटपाडी, पलूस, जत, शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले.
नव्या, जुन्यांची मोट बांधणार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या दिग्गजांनी विकास केला. सध्या सांगलीचे वातावरण तसे राहिले नाही. विकासाचे वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी नव्या लोकांनी संधी द्यावयाची आहे. जुन्यांचे आर्शिवाद हवे आहेत. पक्ष प्रवेशाचा सांगलीत मोठा कार्यक्रम घेऊ. नव्या, जुन्यांची मोट बांधून मोठ्याचा वारसा पुढे सुरु ठेऊ. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीत सक्रीय रहावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर हाेण्यासाठी प्रयत्न राहिल. मात्र सध्या न्यायालयाचा अडथळा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देताना जुन्यांच्या अनुभवाचाही विचार करू.
राष्ट्रवादी जिल्ह्यात होतेय मजबूत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यात सुरुवातीला काहीच नव्हता, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सोडले तर कोणीही मोठा नेता जिल्ह्यात नव्हता, मात्र प्रा. जगदाळे यांच्या बांधणीने जिल्ह्यात आता पक्ष मजबूत होताना दिसत आहे, इंद्रिस नायकवडी यांच्या रूपाने एक आमदार आहे, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, निशिकांत पाटील हे यापूर्वी पक्षात आले आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख (अण्णा) यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांबरोबर रणधीर नाईक, तमनगौडा रवि पाटील यांच्यासारखी फळी देखील पक्षात येत असल्याने राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत होताना दिसत आहे.
सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही धाडसी नेत्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कामाची दखल घेतली आहे. यापुढे पक्षवाढीसाठीचे काम तेवढ्याच ताकदीने करु.
-शिवाजीराव नाईक, माजी मंत्री