पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, असं म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. प्रसारमाध्यमांच्या मित्रांनी जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं असं पडळकरांनी म्हटलं आहे.
पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडलं
भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खालच्या पातळीची भाषा वापरत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली…
अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संभाजी महाराज धर्मवीर नसते तर ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.” संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला.