Photo Credit- social media
मुंबई: विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी मतदारसंघात बैठका, सभा घेण्यास सुरूवात केली आहे.तिकीट मिळवण्यासाठी आजी-माजी आमदारांसह अनेक इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे इंदापूर भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच पंढरपुरातून भाजपसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पंढरपुरातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या निर्णयाने भाजपला पंढरपुरात मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
हेदेखील वाचा: ‘त्या’ डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला पोलीस कोठडी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (29 ऑगस्ट) पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मोठी बैठक पार पडली. या बैठकीत वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वसंतराव देशमुख लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह हातात तुतारी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.वसंतराव देशमुखांमुळे पंढरपुरमध्ये शरद पवारांची ताकद वाढणार आहे.
वसंतराव देशमुख गेल्या 40 वर्षांपासून देशमुख भाजपमध्ये सक्रिय आहेत. पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक अशीही त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे पंढरपुरमध्ये तळागाळात त्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला आहे. आगामी विधानसभेत नशीब आजमावण्याची त्यांची इच्छा होती. भाजप पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली. पण भाजपने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याच मानले जात आहे.
हेदेखील वाचा: गुजरात आहे जगातील सर्वात मोठ्या माशाचे घर; आतापर्यंत 900 शार्कला दिले जीवदान