मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात बोगस डॉक्टरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. दरम्यान या घटनेकडे तालुका आरोग्य अधिकार्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे बोगस डॉक्टरांना अभय मिळत असल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष देवदत्त पवार यांनी पंचायत समितीकडे केली आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त डिग्री नसलेले अनाधिकृत डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटून रुग्णांना लुटण्याचा राजरोस धंदा सुरु केला आहे. या बोगस डॉक्टरकडे कुठलीही वैद्यकीय डिग्री नसताना हे रुग्णांच्या जिवीताशी खेळत असताना तालुका वैद्यकीय अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भुमिकेत असल्याने नागरिकांमधून त्यांच्या कर्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी बोगस डॉक्टरांची माहिती काढून गटविकास अधिकारी यांना देणे अपेक्षित असताना आत्तापर्यंतच्या सेवेत त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. मागील काही वर्षापुर्वी अशा १२ बोगस डॉक्टरवर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पोलीसात गुन्हे दाखल करुन त्यांची दुकानदारी बंद केली होती. तद्नंतर आरोग्य विभागाने अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे याचा सुळसुळाट सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे.
डॉक्टरांचा आरोग्य विभागाकडून सर्व्हे करावा
अशा अनाधिकृत डॉक्टरमुळे अधिकृत डिग्रीप्राप्त डॉक्टरच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांनी गांभीर्यपुर्वक या कामी लक्ष घालून आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचा सर्व्हे करावा. तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष पवार यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती पंचायत समिती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदींना देण्यात आल्या आहेत.