फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News: जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली बुलढाणा पोलिस दलाने सन २०२५ मध्ये कायदा व सुव्यवस्था राखत गुन्हेगारीवर मोठा अंकुश ठेवला. वर्षभरात तब्बल ५९ कोटी ७३ लाख १७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. यासोबतच गंभीर गुन्ह्यांमध्ये सुमारे १० टक्के घट झाली असून, गुन्हे उलगडण्याचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
पोलिस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारताच निलेश तांबे यांनी पहिल्याच क्राईम मीटिंगमध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. पोलिस–नागरिक सुसंवाद वाढवणे, तरुणांना व्यसनमुक्तीकडे वळवणे आणि गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या. त्याचबरोबर घडलेल्या गंभीर व किचकट गुन्ह्यांची जलद आणि अचूक उकल करून पोलिसांनी कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. जिल्ह्यात दाखल झालेल्या एकूण ५६ खुनाच्या गुन्ह्यांपैकी ५५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
२०२५ मध्ये एकही दंगल नाही
२०२४ मध्ये जिल्ह्यात १० दंगलीच्या घटना घडल्या होत्या. मात्र २०२५ मध्ये चोख पोलिस नियोजन, प्रतिबंधात्मक बंदोबस्त आणि गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेल्या धाकामुळे एकही दंगल घडली नाही. नगरपालिका निवडणुका, व्हीव्हीआयपी दौरे तसेच सर्व सण–उत्सव शांततेत पार पडले, हे विशेष.
बुलढाणा पोलिसांच्या सायबर सेलने नागरिकांची फसवणूक रोखत २८.६६ लाख रुपये परत मिळवून दिले. ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीत अडकलेल्या एका नागरिकाला वाचवून त्याचे १० लाख रुपये सुरक्षित करण्यात आले.
दरोडा व चोरी प्रकरणांतून १३ कोटी ६६ लाख ४७ हजार ०३६ रुपये, अंमली पदार्थविरोधी १०३ केसेस करून १३.६५ कोटी, अवैध गौण खनिज प्रकरणांत १३३ केसेस करून १३.०१ कोटी, तर ७ कोटी ०५ लाख ५४ हजार ५३६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याशिवाय ५३३ मोबाईल (किंमत ६३.९६ लाख रुपये) जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ लाख १३ हजार ६९ वाहनधारकांकडून ५.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १५ गावठी पिस्तूल, ९१ काडतुसे, तलवारींसह शस्त्रसाठा जप्त झाला.
‘मिशन परिवर्तन’मुळे तस्करांचे कंबरडे मोडले
‘मिशन परिवर्तन’ या नाविन्यपूर्ण मोहिमेतून अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. गांजा व एमडी ड्रग्जसंबंधी १०३ केसेस करून ११८ आरोपींना अटक करण्यात आली आणि १३.६५ कोटींचा मुद्देमाल जप्त झाला. जप्त केलेला अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आला. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता पथनाट्य, सायक्लोथॉन व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आलेल्या २६.४९ कोटींच्या मुद्देमालाचाही या एकूण कामगिरीत समावेश आहे. बुलढाणा पोलिसांच्या या सर्वांगीण कामगिरीमुळे जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.






