बुलढाण्यातील केसळतीमागचं काय आहे कारण? (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी दिली. अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य किशोर दराडे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, या केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याच्या तपासणीसाठी आय सी एम आर कडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केसगळतीचे प्रकार कशामुळे घडत आहेत हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या गावांमधील लहान मुले तसेच गर्भवती महिला यांचीही आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
तसेच राज्यात शासानामार्फत अनेक योजना राबवण्यात येत असतात. त्यामध्ये लाभार्थ्यंना धान्य वाटपापासून शिवभोजन, मध्यान्न भोजन अशा योजनांचा समावेश आहे. अशा थेट अन्न धान्य आणि खाद्यांनांशी संबंधित योजनांच्या वाटपामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचा आणि खाद्यांन्नांचे वाटप होते का नाही याची तपासणी करण्यात येते. या खाद्यांन्नांच्या तपासण्या आणखी कडक करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. आश्रमशाळा तसेच शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही ठिकाणी यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे यांनी सभागृहात सांगितले.
अखेर बुलढाण्यातील केसळतीमागचं कारण आलं समोर
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यात अचानक केसगळतीची समस्या सुरू झाली होती. अचानक टक्कल पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. शेगाव तालुक्यातील 12 गावं केसगळतीनं बाधित आहेत, तर नांदुरा तालुक्यातील एका गावात केसगळतीचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान अनेक मेडीकल संस्थानी संशोधन करूनही या आजाराचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं, मात्र डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी या भागातील रुग्णांवर संशोधन करून केसगळतीचं कारण शोधून काढलं आहे. हिम्मतराव बावस्कर यांनी याआधीही विंचूदंशावरील औषध शोधून काढलं होतं. त्यांना पद्श्री पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे.
Buldhana News : अखेर बुलढाण्यातील केसळतीमागचं कारण आलं समोर; तर तुमच्याही भागात पसरू शकतो आजार
बुलढाण्यात केसगळतीचं पहिलं प्रकरण 31 डिसेंबरला समोर आलं होतं. शेगाव तालुक्यातील बोंडगावात एका कुटुंबाती महिलेचे आणि दोन मुलींचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. पण, शाम्पूमुळे केस गळत असं त्यांना सुरुवातीला वाटलं. सुरुवातीचे तीन दिवस त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण, चौथ्या दिवशी अर्ध्यापेक्षा कमी केस डोक्यावर शिल्लक राहिले. त्यामुळे त्यांनी खासगी डॉक्टरांना दाखवलं. चुकीचा शाम्पू वापरल्यामुळे ही केसगळती होत असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. दुसऱ्याच दिवशी गावात केसगळतीचं आणखी एक प्रकरण समोर आलं. या व्यक्तीनं कधीही शाम्पूचा वापर केला नव्हता. त्यामुळे हा काहीतरी गंभीर प्रकार असल्याचं निष्पन्न झालं. ही बाब कळताच बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली. आता जिल्ह्यात जवळपास २२२ रुग्णांना याची लागण झाली आहे.