लोहगाव विमानतळावरून बुकिंग रद्द करणाऱ्या कॅब चालकांना ‘नो एन्ट्री’; एरोमॉल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)
पुणे : लोहगाव विमानतळाच्या समोर असलेल्या एरोमॉलमध्ये काही कॅबचालक प्रवाशांनी केलेली बुकिंग वारंवार रद्द करत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याच्या प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहे. याची गंभीर दखल घेत एरोमॉल प्रशासनाने आता अशा कॅब चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना एरोमॉल परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे एरोमॉल प्रशासनाने जाहीर केले आहे.
हेदेखील वाचा : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार; सांगली, सातारा, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
लोहगाव विमानतळावरून प्रवासी उतरल्यानंतर प्रवाशांनी कॅब बुक केल्यानंतर काही चालक त्यांना जर जवळ सोडायचे असल्यास ते बुकिंग रद्द करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी असा प्रकार घडत असल्याने प्रवासी हतबल ठरत आहे. शिवाय काही चालक जास्तीची रक्कम घेत असल्याने प्रवाशांनी त्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे. या सर्वांची गंभीर दखल एरोमॉल प्रशासनाने घेतली आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडला होता. मात्र, त्यावेळी चालकांना समज देण्यात आली होती. आता मात्र थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार
याबाबत बोलताना लोहगाव एरोमॉलचे उपाध्यक्ष युवराजसिंग राजपूत म्हणाले, बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असून, अशा वाहनांना एरोमॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात येईल. प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
30 टक्के बुकिंग रद्द केल्याचे निरीक्षण
एरोमॉल प्रशासनाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, मागील दोन आठवड्यांत एकूण कॅब बुकिंगपैकी सुमारे ३० टक्के बुकिंग चालकांनी रद्द केली. काही चालकांनी प्रवाशांचा लोकेशन पाहून किंवा पेमेंट मोड न पटल्यास बुकिंग नाकारल्याचे आढळून आले आहे. यामुळे प्रवासी सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हेदेखील वाचा : Sindhudurg News : “पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”; परशुराम उपरकरांचा खोचक टोला