छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालावधीनंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्त प्रस्तावापैकी काही निवडक प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल, अशी शक्यता आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मराठवाडाच्या विकासाला उभारी देण्यासाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या बैठकीत देखील मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या.
मात्र, या घोषणा फक्त कागदावरच होत्या, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप विरोधक करीत आहेत. मराठवाड्यात आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे.
कोणत्या कामांचे प्रस्ताव मांडले जाणार?
मराठवाड्यातील दळणवळण, सिंचन तसेच कृषी, वैद्यकीय महाविद्यालय, रिंग रोड बनविण्यासह जलसंपदा खात्याने विभागात १,३११ कोटी खर्चातून सहा नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव या बैठकीसमोर मांडले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगिलतं आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजासाठीही विशेष पॅकेज जाहीर केले जाऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलं आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजादेखील हैराण आहे. हीच बाब लक्षात घेता, राज्य सरकारकडून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.