सौजन्य - नवराष्ट्र टीम
सांगली : सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी दिनांक १ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. विरोधकांच्या विकृत मनःस्थितीचा, जातीयवादाचा ‘रावण’ जाळण्याचा कार्यक्रम होईल. जयंत पाटील अर्थमंत्री असतानाचा ऑनलाईन लॉटरी घोटाळा, वाशी मार्केटमधील भ्रष्टाचार, ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या, सांगली जिल्हा बँकेतील गैरकारभार आणि नोकरभरतीची चौकशी लावू, असा इशारा भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
सांगलीत विश्रामबाग येथे गुरुवारी भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सांगलीत विरोधकांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेच्या निमित्ताने जो प्रकार केला, त्याला रिअॅक्शन नाही, पण उत्तर द्यावे लागेल. त्यासाठी सांगलीत दिनांक १ रोजी सायंकाळी ५.३० वाजता इशारा सभा घेणार आहोत. त्या सभेत विरोधकांच्या भाषणाच्या क्लिपा दाखवणार आहोत. मला एकादशीला मटण खायला आवडेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यातून त्यांनी १८ लाख वारकऱ्यांची चेष्टा केली. ती क्लिप दाखवली जाईल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथील सभेत काय भाषण केले होते? त्याला जयंत पाटील टाळ्या देत होते. ते मिटकरी आता आमच्याबरोबर बसतात. पण त्यावेळी ते कोणत्या पक्षात होते? जयंतरावांनी मिटकरींच्या बोलण्याला विरोध का केला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार पडळकर यांनी जे वाक्य वापरले, ते त्यांनी म्हणावे की नाही म्हणावे, याची चिंता महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस करतील. ते तेवढे खंबीर आहेत. भल्या भल्या माणसांना ते हाताळतात. ते पडळकर यांचा कान धरतील. मी प्रदेशाध्यक्ष असताना पडळकर यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोविडचा विषाणू आहे’, असे म्हटले होते, त्यावेळी त्याना आम्ही सूचना दिल्या होत्या, तुम्ही देता का तुमच्या लोकांना सूचना, असा सवाल विरोधकांना चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
शरद पवारांनी जातीयवाद निर्माण केला
पाटील म्हणाले, एका कार्यक्रमात कोणी तरी शरद पवार यांना पुणेरी पगडी घालायला दिली. पण त्यांनी ती घातली नाही. ‘ज्योतिबा फुले यांची पगडी द्या’, असे ते म्हणाले होते. पुणेरी पगडी आणि फुले पगडी म्हणजे काय ? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे सदस्य केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, ‘आता पेशवे राजे ठरवणार का?’ या वाक्याचा अर्थ काय? जातीयता कोणी निर्माण केली?
बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करा; जयंतरावांच्या भ्रष्टाचारावर बोला
चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार पडळकर यांचे डोके जरा गरम आहे. त्यांनी आता ‘डोक्याने’ चालावे. राजारामबापू यांच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटील यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचे. त्यांचे कारखाने किती, त्यांचे गाळप किती, त्यांचे मोलॅसिस कुठे जाते, यावर बोला. त्याचे आकडे बाहेर काढा.
बिल्डरच्या डायरीत नेत्याचे नाव..!
चंद्रकांत पाटील म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या बिल्डरच्या डायरीत एका नेत्याचे नाव होते. त्यावेळी कोण रात्री तीन-तीन वाजेपर्यंत फडणवीस यांच्या घराबाहेर बसत होता? त्या आत्महत्या प्रकरणातील डायरी अद्याप नष्ट झालेली नाही. या सर्व प्रकाराची चौकशी लावू. वाशी मार्केटच्या भ्रष्टाचाराची चौकशी लावू, त्यासाठी प्रसंगी मी उपोषण करेन. जयंत पाटील अर्थमंत्री असताना झालेल्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचीही चौकशी सुरू करावी लागेल, असेही ते म्हणाले.