Chandrapur News: राजुरा शहरात दुषित पाणीपुरवठा सुरु, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!
काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांना ताप, उलटी, पोटदुखी असे त्रास जाणवल्याने नागरिकांनी थेट उप जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जवळपास २० ते २५ रुग्ण दाखल झाल्याने लगेच औषधोपचार सुरू झाले. रुग्ण संख्येत होणारी प्रचंड वाढ बघता आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर येत इंदिरानगर वॉर्ड येथील समाजभवनात आरोग्य शिबिर घेऊन स्थानिक रहिवाशांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार सुरू केले. तसेच वॉर्डात गृहभेटी देऊन सर्व्हे करून आरोग्यविषयक माहिती घेण्यात येत आहे. नगर परिषदेतर्फे पाण्याची टाकी स्वच्छ करून पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात आला व टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरू आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नळाची पाइपलाइन लिकेज शोधून ते दुरुस्ती करणे सुरू आहे. विशेष म्हणजे या परिसरात ३ बोअरवेलचे पाणी शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा होत आहे. खूप जुनी नळयोजना असून लोखंडी पाइप सडून त्यातून नालीचे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे घराघरांत जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी केली. यावेळी आ. देवराव भोंगळे, अरुण धोटे, गीता सिद्धार्थ पथाडे, महेंद्र बुरडकर, नितीन सीडाम, सचिन भटारकर, बादल बेले व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी इंदिरानगर येथील परिस्थितीची माहिती घेऊन स्थानिक नागरिकांना धीर दिलाय.
राजुरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव यांनी सांगितलं आहे की, स्थानिक इंदिरानगर वॉर्डातील रुग्ण मोठ्या संखेने उप जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, जवळपास जुलाब, पोटदुखी, मळमळ उलटी, ताप अशी लक्षणे आढळून आली, रुग्णांवर योग्य तो औषधोपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पाण्याचे नमुने तपासणी करीता पाठविले असून अहवाल आल्यावरच सांगता येईल. शनिवारी (दि. ६) सकाळपासून इंदिरानगर येथे आरोग्य तपासणी शिबिर घेऊन आलेल्या रुग्णांना औषधोपचार दिल्या जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही शारीरिक त्रास जाणवत असल्यास तत्काळ उप जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधावा.
पाणीपुरवठा अभियंता सुमेध खापर्डे यांनी सांगितलं आहे की, इंदिरानगर वॉर्ड येथे दूषित पाणीपुरवठ्याची माहिती मिळताच येथील पाण्याची टाकी पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली. परंतु टाकीत दुर्गंधी किंवा कोणतीही संशयित बाब आढळून आली नाही. तसेच येथील पाणीपुरवठा नळाच्या दोन ठिकाणी असलेले लिकेज शोधून दुरुस्ती करण्यात आले. आणखी कुठे लिकेज आहेत त्याचा शोध सुरू आहे. नगर परिषदतर्फे टँकरद्वारे इंदिरानगर वॉर्डातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. क्लोरिनच्या गोळ्या वाटप केल्या जाईल व आरोग्यविषयक जनजागृती सुरू आहे.






