Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७२.३५ टक्के मतदान झाले असून २१६८० मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेले मतदान यांची मतदान यंत्र ठेवण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्ट्रॉग रूम बनवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कर्जत नगरपरिषद निवडणुकीत मतदान झालेली मतदान यंत्र आणि मतदान युनिट हे ज्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आले आहे, त्या परिसरात २४ तास पोलिसांचा सशस्त्र पहारा ठेवला असून येथे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना दिसेल असे स्क्रीनवर सीसीटीव्ही कॅमेरे यांचे चित्रीकरण दिसण्याची व्यवस्था केलेली आहे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना जाण्याची परवानगी असलेल्या जागेवरून स्ट्रॉग रूम आणि त्या खोलीला लावण्यात आलेले कुलूप हे स्पष्ट दिसत आहे.
महाड, वा. २ डिसेंबर रोजी झालेल्या महाड नगरपरिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदांचे भवितव्य ठरवणाऱ्या ईव्हीएमना नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये बहुपदरी सुरक्षा कवच देण्यात आले आहे. स्ट्रॉगरूम परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सतत देखरेख, रायफलधारी पोलीस, एक एसआरपी प्लाटून आणि शासकीय कर्मचाऱ्यांची सततची उपस्थिती असल्याने सुरक्षा अभेद्य झाली आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणीची तारीख जाहीर झाली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रॉगरूमची जबाबदारी व सुरक्षा व्यवस्थेचे ओझे पोलीस आणि प्रशासनावर अधिक वाढले आहे.
दुसरीकडे कर्जत नगरपरिषदेचे मतदान यंत्रांची मोजणी ही पाच फेरीमध्ये होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉग रूम येथे लावण्यात आलेले सील उघडण्यात येईल आणि त्यानंतर मतदान यंत्र मतमोजणीसाठी मतमोजणी कक्षात आणली जाणार आहेत. मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात येणार असून पालिका निवडणुकीसाठी आठ प्रभागात तीन मतदान केंद्र असल्याने तेथे तीन फेऱ्यांमध्ये निकाल स्पष्ट होणार आहे. तर प्रभाग आठमध्ये चार मतदान केंद्र असल्याने त्या प्रभागाचा निकाल चौथ्या फेरीत आणि प्रभाग १० मध्ये पाच मतदान केंद्र होती, त्यामुळे त्या प्रभागाचा निकाल पाचव्या फेरीत लागणार आहे.






