Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
Chandrshekhar Bavankule on CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन हे नौटंकी आहे. सरकारला बदनाम करण्याकरता हे आंदोलन केलं जात आहे. अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी सीजेपीने संसद भवनावर मोर्चा आयोजित केला. दुपारच्या सुमारास हा मोर्चा संसदभवनाच्या परिसरात दाखल झाला. त्यावेळी दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांवर बेछुट लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
या सगळ्या प्रकरणावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थी आंदोलनावर तोफ डागली आहे. ‘नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिलं आहे. १४० कोटी भारतीयांनी बहुमत दिले आहे. काहीतरी सरकारविरोधी भूमिका घ्यायची, पेपरफुटी झाली हे चूकच आहे. पण याचा अर्थ धर्मेंद्र प्रधान किंवा सरकारने पेपर फोडला का, एका सिस्टिममध्ये बदमाशी झाली, ही सरकारची नक्कीच जबाबदारी आहे, सरकारने याची दखल घेतली आहे. याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशातील मुलांची माथी भडकावण्यासाठी हे आंदोलन करत आहेत.अशी टिका बावनकुळे यांनी केली आहे.
तसेच, या आंदोलनाच्या आधी दोन-तीन ट्रक दगड भरुन आणले होते ते कुणी आणले होते, ते दगडफेक जी झाली, त्यामागे कोण होतं. याची चौकशी झाली पाहिजे. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, केल जात आहे. असा आरोप चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे.
नीट पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ, झुरळ जनता पक्षाने (सीजेपी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत एका भव्य ‘संसद मोर्चा’चे आयोजन केले. जंतर मंतरपासून संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या हजारो आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखले, ज्यामुळे संघर्ष, लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा झाला.
सीजेपी संसद मोर्चा सोमवारी दुपारी संसद भवनापर्यंत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलकांनी या अत्यंत सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घाईघाईने मुख्य दरवाजे बंद केले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा माराही केला. वृत्तानुसार, जवळपास २० वर्षांनंतर संसदेच्या भवनापर्यंत पोहोचणाऱ्या मोर्चाला रोखण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरले. संसद भवनाच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक मानली जात आहे.
आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी संसदेसमोरील रेल भवन आणि कृषी भवन चौकाजवळ लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. मोर्चा जवळ येत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांना पळावे लागले. यानंतर त्यांनी संसदेचे प्रवेशद्वार बंद केले. संसदेच्या आत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. सैनिकांनी बहुस्तरीय सुरक्षा घेराव घातला. सभागृहात पेपरफुटी आणि राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सततच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आल्या.






