Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
Maharashtra Politics: राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम पाहत आहे. माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. या जागेबाबत अद्याप पक्षात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या या रिक्त जागेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीचेही मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्तच आहे. त्यामुळे आता राज्यसभा आणि मुंबई अध्यक्षपद या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्या एकाच वेळी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत असून नितीन पाटील यांची मुदत २०२८ पर्यंत आहे. तर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार २०३२ पर्यंत खासदार राहणार आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या जागी पक्ष नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात नाच्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे. या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र प्रश्न केवळ राज्यसभेपुरता मर्यादित नसून, पक्षातील अनेक महत्वाची पदेही अद्याप रिक्त आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपद मागील दहा महिन्यांपासून रिक्त आहे, तसेच रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही नियुक्ती झालेली नाही. याशिवाय समीर भुजबळ यानी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या राजीनाम्यानंतर मुंबई अध्यक्षपदही रिक्तच आहे. त्यामुळे या सर्व पदांसाठी इच्छुकांनी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.






