छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! (Photo Credit- X)
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले, शहराच्या स्वच्छतेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुढील काळात ड्रेनेज साफसफाईसाठी अत्याधुनिक एन्डोबोट उपलब्ध करून दिला जाणार असून, यामुळे कामगारांना ड्रेनेजमध्ये उतरावे लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात मंत्री अतुल सावे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत समाधान व्यक्त केले. संभाजीनगरची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावर निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर समीर राजूरकर यांनी पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन हे शहरातील दोन महत्त्वाचे विषय असल्याचे सांगितले. सिंगल यूज प्लास्टिकविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ९० लाखांचा प्लास्टिक साठा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगत, प्रणालीमुळे स्वच्छतेला मोठी मदत होईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कॅप्सूल वाहनांसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे कचरा संकलनाची गती वाढणार असून स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन ड्रेनेज साफसफाईसाठी ‘एन्डोबोट’ ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातूनच कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ओला व सुका कचरा वेगळा केल्यास संपूर्ण व्यवस्थापन अधिक परिणामकारक ठरणार आहे.






