चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! (Photo Credit- X)
चिकलठाणा विमानतळावर मोठ्या क्षमतेची विमाने उत्तरवण्यासाठी धावपट्टीचा विस्तार आवश्यक आहे. सध्या धावपट्टीची लांबी ९,३०० फूट असून ती १२ हजार फूट करण्याचा प्रस्ताव आहे. धावपट्टीसह टॅक्सी रनवे उभारणीसाठी १३९ एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी परिसरातील जमिनींचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ७३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर ८ जानेवारी २०२५ रोजी कलम ११(१) अंतर्गत ५८ हेक्टर क्षेत्रासाठी प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध झाली. अधिसूचनेनंतर प्रशासनाकडे ३०० हून या अधिक हरकती आणि आक्षेप दाखल झाले होते. त्यावर सुनावणी घेऊन संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
भूसंपादन प्रक्रियेदरम्यान वन विभाग, भूमिअभिलेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाधित मालमत्तांचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित क्षेत्रात काही बदल सुचविल्यामुळे प्रक्रियेला काही काळ विलंब झाला. प्रस्तावित १३९ एकर क्षेत्रापैकी १.५ एकर जमीन वगळणे आणि दुसऱ्या गटात ०.१६ एकर जमीन वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार नव्याने प्रक्रिया पूर्ण करून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. शासनाकडून ३०४ कोटी ८५ लाख उपलब्ध झाले. संपूर्ण भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटींचा अतिरिक्त निधी आवश्यक आहे. निधी मिळताच अंतिम मोबदला जाहीर करून कार्यवाही होईल.
चिकलठाणा विमानतळावर मोठ्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमाने उतरू शकावीत, यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या असलेली ९,३०० फुटांची धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या विस्तारामुळे भविष्यात विमानसेवा वाढविणे आणि मोठ्या विमानांचे संचालन शक्य होणार आहे. यासाठी धावपट्टी आणि टॅक्सी रनवे उभारणीसाठी एकूण १३९ एकर जमीन संपादन केली जात आहे.






