एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! (Photo Credit - AI)
अपघातानंतर उघडले नशिबाचे दार
मुकेश गामेती हा युवक गेली सहा वर्षे भटकंती करत गुजरातमधून महाराष्ट्रात पोहोचला होता. ३ नोव्हेंबर रोजी भेंडाळा फाटा येथे झालेल्या अपघातात तो जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तो बरा झाला, परंतु त्याची भाषा केवळ गुजराती असल्याने त्याच्या कुटुंबाची ओळख पटवणे रुग्णालयासाठी मोठी समस्या ठरली. वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतरही भाषेच्या अडथळ्यामुळे डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. अखेर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मागितली, येथूनच या शोधमोहिमेचा नवा प्रवास सुरू झाला.
डॉक्टरांमुळे भेटला ‘देवमाणूस’
डॉ. खंदारे यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते फैसल बासीलान यांनी गुजराती भाषा जाणकारांचा शोध सुरू केला. अखेर शहरातील अमजत पठाण यांच्या नातेवाईकांमार्फत आशेचा किरण दिसला. रहिमभाई उस्मानभाई खलीफा (सुरेंद्रनगर, गुजरात) हे तातडीने रुग्णालयात आले आणि त्यांनी मुकेशशी गुजराती भाषेत संवाद साधला. संवादादरम्यान मुकेशने आपले नाव मुकेश लालजीभाई गामेती आणि गुजरातमधील घरचा पत्ता सांगितला. त्यानंतर फैसल बासोलान यांनी रहिमभाईंच्या मदतीने गुजरात पोलीस आणि मुकेशच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
६ वर्षांनंतर घरी परतला मुकेश
मुकेश बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने त्याचा शोध घेतला होता, परंतु तो सापडला नाही. कोरोना काळात तो हयात नसेल, असे समजून कुटुंबीयांनी मनाची समजूत घातली होती. सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर, १९ नोव्हेंबर रोजी मुकेशचे भाऊ मन्नुभाई लालजीभाई गामेती, कालुभाई लालजीभाई गामेती आणि भावजयी अरुणाबेन तातडीने गंगापूरच्या रुग्णालयात दाखल झाले. सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या भावाला सुरक्षित आणि सुदृढ पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. डॉ. अभिजित खंदारे यांचे काटेकोर उपचार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ६ वर्षांनंतर या घरात पुन्हा आनंदाचा दिवा पेटला.






