विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना दिलेल्या निवेदनात सरपंच मंगेश साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित क्यूआर कोड स्कॅनर घोटाळयात मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा मोठा हात आहे. त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री तालुक्याच्या आमदार असून पदाचा गैरवापर करुन त्यांच्या विरुध्द आंदोलन व तक्रारी करणाऱ्यांना धमक्या देणे आणि दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
सामान्यांच्या बाजूने आवाज उचलणाऱ्यांचे हे लोक आवाज दाबवण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कथित स्कॅनर घोटाळचा तपशील देत चौकशीची मागणी केली होती. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्या पुराव्याची होळी करणार आहोत.
फुलंब्री मतदारसंघातील सर्व कामांचा निकाल लावण्यासाठी तालुक्यातील नेत्यांना भेटीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बोलावले जात आहे. दररोज नेत्यांची रांग अन् बैठकांचे सत्र मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यालयात पार पाडण्याचे काम केले जात आहे. विभागातील दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तालुक्यातील भाजप नेते कसे येतात अन कधी बाहेर जातात याचा तपशील उघड होईल, असा आरोपही साबळे यांनी लावला आहे. मुख्य अभियंता कार्यालय हे मराठवाड्यातील सा.बां. विभागाच्या कामासाठी असले तरी हे कार्यालय भाजपसाठी वापरले जात आहे. पत्नी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदारांचा स्टीकर असलेली मोठी कार कार्यालयात उभी केली जात होती. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते वाहन कार्यालयात लावणे बंद झाले होते. असे असले तरी मतदारसंघातील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून त्याची देखील चौकशी होणे गरजेचे असल्याचे साबळे यांनी म्हटले.






