'माणुसकी' अजूनही जिवंत! साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने मालकाला परत (Photo Credit - X)
वैजापूर, (वा.): आजच्या स्वकेंद्रित जगात ‘माणुसकी’ आणि ‘प्रामाणिकपणा’ हे केवळ पुस्तकातील शब्द झाले आहेत की काय? असा प्रश्न पडत असतानाच, वैजापूर येथील एसटी बसस्थानकात एका सामान्य सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे मूल्य आजही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. एसटी सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांनी तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस बॅग तिच्या मूळ मालकाला परत करून अतुलनीय प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.
९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी वैजापूर बसस्थानक परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी बसस्थानकातील बाकावर त्यांना एक बेवारस बॅग आढळली. संशयास्पद वस्तू समजून त्यांनी ती बॅग तात्काळ उचलली आणि एस.टी. नियंत्रक कार्यालयात जमा करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर प्रवासी गणेश देविदास जानराव हे आपली बॅग हरवल्याचे सांगत बसस्थानकात चौकशी करत आले. तडवी यांच्या त्वरित लक्षात आले की, त्यांनी जमा केलेली बॅग याच प्रवाशाची असावी.
तत्काळ प्रवाशाला एस.टी. नियंत्रकांच्या कार्यालयात नेण्यात आले. एस.टी. आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅग उघडण्यात आली असता, त्यात तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि अन्य काही महत्त्वाच्या वस्तू असल्याचे दिसून आले. प्रवाशाने बॅगेचे अचूक वर्णन दिल्यानंतर ओळख पडताळणीची प्रक्रिया पार पाडत दागिने व इतर वस्तू असलेला ऐवज त्यांच्या सुपूर्द करण्यात आला.
लाखोंच्या मोहावर मात करून प्रामाणिकपणा जपणाऱ्या सुरक्षा रक्षक बी. आर. तडवी यांच्या निस्वार्थ कृतीबद्दल वैजापूर एस.टी. आगाराचे प्रमुख किरण धनवटे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी एस. टी. चे टी. आय. भदाणे, कोकाटे, गरुड, जाधव, गंगवाल, ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी तडवी यांच्या कामगिरीचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
आज ज्या काळात हरवलेली वस्तू मिळण्याची शक्यता खूप कमी असते, त्या काळात बी. आर. तडवी यांनी दाखवलेला हा प्रामाणिकतेचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या घटनेमुळे एसटी विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही तडवी यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव होत आहे.






