बारामती : मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. तरीदेखील नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याची घाई दोन्ही मंत्रिमंडळाला झालेली दिसते. जनतेतून फक्त नगराध्यक्षपद व सरपंचपद कशाला? राष्ट्रपती व मुख्यमंत्री निवडही जनतेतूनच करा, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.
बारामती येथे पत्रकारांशी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बहुमत ज्या पक्षाला असते, त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात. राज्यातही १४५ आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात. अशाच पद्धतीने नगराध्यक्ष व सरपंचपदाच्या निवडी होत होत्या. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असल्यास काय होते, याचा अनुभव यापूर्वी अनेक वेळा घेतला आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण ही बाब लोकशाहीला घातक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1967 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी ठरवलेली धोरणे महत्त्वाची आहेत.
नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याबाबत विधिमंडळात चर्चा करण्याची आवश्यकता होती. आमदाराचे मत देखील विचारात घेतले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिला. याबाबत आपले दुमत नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
नामांतराच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी मंत्रिमंडळ विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, हा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे घेतील.