संग्रहित फोटो
मंगळवेढा/शिवाजी पुजारी : मंगळवेढा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची दूधाची मागणी वाढल्याने म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार घडत आहे. याकडे अन्न औषध प्रशासनाचे कर्मचारी दुर्लक्ष करत गांधारीच्या भूमिका घेत असल्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप अशा प्रतिक्रीया नागरिकामधून व्यक्त होत आहे.
दीपावलीत दूधाची मागणी घरोघरी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जर्शी गायीचे दूध भेसळ करण्याचा प्रकारही वाढत आहे. भेसळीचे दूध घरी नेहून तापवल्यानंतर पिवळी साय येवून चवीलाही बेचव लागत असल्याचे अनेकांनी सांगीतले. जर्शी गायीचे दूध स्वस्त दरात विकले जाते, तर म्हशीचे दूध महाग दरात विकले जाते. याचा फायदा घेण्यासाठी जर्शी गायीचे दूध म्हशीच्या दूधात भेसळ करून दूधवाले मालामाल होत आहेत. मंगळेवढ्यासाठी नेमलले अन्न भेसळचे अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. भेसळ करणाऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
डोंगर पोखरुन उंदीर काढला
दुसरीकडे शहरात पानटपऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात गुटखा, मावा खुलेआम सुरु असतानाही कारवाई केली जात नाही. विधानसभेत गुटख्याविरुध्द विरोधकांनी आवाज उठविल्यावर अन्न भेसळ प्रशासन खडबडून जागे झाले व मंगळवेढ्यात केवळ एकावर कारवाई केली. मात्र हा डोंगर पोखरुन उंदीर काढल्याचा प्रकार म्हणावा लागेल. अधिकारी केवळ हात ‘ओले’ करीत असल्याची खमंग चर्चा शहरात सर्वत्र सुरु आहे.
पदार्थाचे नमुने घेण्याचा केवळ बहाणा
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दामाजी चौकातील एका चहा टपरीमधून विविध पदार्थाचे नमुने घेण्याचा केवळ बहाणा केला. त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. नुसते नमुने नेले जातात, पुढे पुण्याला पाठविले जातात, असे वारंवार सांगितले जाते. मात्र कारवाई शुन्य आहे. या निष्क्रीय अधिकाऱ्याला येथून बदलून सक्षम अधिकारी नेमण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.