मुंबई : शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यात रंगलेल्या वादामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा वाद शंभर टक्के मिटला आहे, असे कदम यांनी सांगितले.
आता भविष्यात आपापसात वाद झाले तर ते मुख्य नेत्यांकडे बोलले पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली. कीर्तिकर काल मुख्यमंत्र्यांना भेटून आले. त्यांची भूमिका सांगितली. कदम म्हणाले की, मी कीर्तिकर यांच्याबाबत जी विधाने केली ती अगदी योग्य होती, असे मला वाटते.
”पक्षासाठी मी कफन बांधून लढलो. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे पाहिले जाते. कुठलीही शहानिशा न करता मला राजकारणातून संपवण्याकरिता एखादी प्रेसनोट काढणे हे कितपण योग्य आहे? शाखाप्रमुख म्हणून मी जे काम केले, त्या जोरावर कीर्तिकर निवडून आले होते. आता भविष्यात असे काहीही बोलणार नाही”.
रामदास कदम करत असलेले आरोप मला मान्य नाहीत. ते आरोप करतायेत म्हणून मी प्रतिआरोप या भूमिकेत मी आता नाही. मी सविस्तर निवेदन, माझ्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्या. मला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही भांडायला लागलो तर चांगला संदेश जाणार नाही.
– गजानन कीर्तिकर, खासदार, शिंदे गट