मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह भारतामध्ये आणण्यासाठी मदत केली (फोटो - सोशल मीडिया)
Devendra Fadnavis News: नांदेड : दुबईमध्ये कामसाठी गेलेल्या तरुण मुलाचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाल्याची बातमी आई-वडीलांना समजली. यामुळे त्या शेतमजूर दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तीन दिवसांपूर्वी त्यांना याबद्दल माहिती देण्यात आली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबाचे दुःख जाणून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची अखेरची भेट घडवून आणत संवेदनशीलता दाखवली.
श्याम अंगरवार असे दुबईला जाऊन मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील मुलाचे नाव आहे. श्याम हा फक्त सत्तावीस वर्षांचा तरुण होता. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील या भागातील अनेक जण दुबईला नोकरीसाठी जातात. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतमजूर असलेल्या आईवडलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी श्यामही कामगार म्हणून दुबईला गेला. इमाद नावाच्या कंपनीत श्याम कामाला होता. पण दुसरी चांगली संधी खुणावत होती. त्यामुळे त्याने ही कंपनी सोडली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्यामचा अवघ्या काही दिवसांपूर्वी वाढदिवस देखील झाला होता. त्याचे दुबईमध्ये व्यवस्थित काम देखील सुरु होते. मात्र नियतीच्या मनामध्ये काही वेगळेच दडले होते. श्यामच्या मृत्यूचे कारण फक्त त्याचा ताप ठरला. दुबई येथील एनएमससी रॉयल हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या तापामध्ये श्यामचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक ऑक्टोबर रोजी श्याम अंगरवार याला देवाज्ञा झाली. मात्र महाराष्ट्रातील किनवटमध्ये त्याच्या आई वडिलांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.
दुबईमध्ये कामाला असल्याबाबत आई-वडीलांना आपल्या मुलाचा अभिमान होता. मात्र मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना तीन दिवसांनंतर चार ऑक्टोबरला समजली. यानंतर त्यांच्या आई-वडीलांना काय करावे तेच समजत नव्हते. दुबईमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यामुळे त्याचे एकदा तरी शेवटचे भेटावे असे त्यांच्या मनामध्ये होते. दु:खात बुडालेल्या या शेतमजूर दांपत्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या गोवर्धन मुंडे यांना समजली. त्यांनी पाच ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना एक मेसेज करून याबाबत माहिती दिली. तसेच मदतीचे आवाहन देखील केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना आलेल्या प्रत्येक मेसेज, कॉल आणि पत्राचे उत्तर देत असतात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील या तरुणाच्या आई-वडीलांबाबत विलक्षण संवेदनशीलता दाखवली. एका शेतमजूर आई-वडिलावर आलेल्या या दुःखद प्रसंगाची माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री हेलावून गेले. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व तपशील दिले. पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूत्रे हलविली जाऊ लागली. मृत्यूच्या दाखल्याचा प्रश्न होता. परराष्ट्र मंत्रालयाशी सतत पाठपुरावा केल्यावर दाखला मिळाला.
फडणवीस यांचा स्वत: वैयक्तिक पातळीवर खर्च
श्याम अंगरवार याची घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे श्यामचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्यांना अर्थिक मदत देखील लागणार होती. यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वैयक्तिक पातळीवर खर्च करण्याची तयारी दर्शविली. मग परराष्ट्र मंत्रालयालाने खर्च करण्याचे मान्य केले. श्याम अंगीरवार यांचे पार्थिव रविवारी मध्यरात्री १२ ऑक्टोबर रोजी दुबईवरून विमानाने हैद्राबाद विमानतळावर आणण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तेथून पुढची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले होते . नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने श्यामचे पार्थिव किनवटपर्यंत पोहोचविले. रविवारी १२ ऑक्टोबरला श्यामचा अंत्यविधी झाला.या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री देवासारखे धावून आल्याने या गरीब दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन तरी मिळू शकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतमजूर दांपत्याबद्दल संवेदनशीलता दाखवल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.