पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll) प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेतेमंडळींनी पुण्यात तळ ठोकला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी रॅली काढली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘आम्ही गिरीश बापट यांना मैदानात येऊ नका, असे सांगितले. बापटांना सांगितलं फक्त आशीर्वाद द्या’.
भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कसबा मतदारसंघात रोड शो करण्यात आला होता. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आवाहन केले होते, विनंती केली होती. तशी आपली परंपरा देखील आहे. पण पोटनिवडणूक लागली. सध्या खालच्या पातळीवर राजकारण केले जात आहे.
गिरीश बापट यांच्याबाबत म्हणाले…
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याचे खासदार गिरीश बापट हे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहिला मिळाले होते. प्रकृती ठीक नसतानाही ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही गिरीश बापट यांना मैदानात येऊ नका, असे सांगितले. बापटांना सांगितलं फक्त आशीर्वाद द्या’.
मी माणसातला कार्यकर्ता
अजित पवार म्हणाले होते, पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरसभा घ्यायची नसते. त्यावर शिंदे म्हणाले, मी माणसातला कार्यकर्ता आहे. आम्ही लोकांना सामोरे जाणार आहोत.