सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी २६/११ च्या हल्ल्या प्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्याचा निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते, आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणारे भाजपचे नेते किती खरे बोलतात ते समोर येईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. तसेच पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे खुशाल चौकशी करून दोषींवर कारवाई करा. या हल्ल्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. कारण मी काही त्यावेळी गृहमंत्री नव्हतो. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा खुशाल चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावे, असं आव्हान अजित पवार यांनी माधव भांडारी यांना दिले आहे.
हिंदीच्या सक्तीमागे मोठे षडयंत्र
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरु आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरात मध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा, ही आमची मागणी कायम आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले संग्राम थोपटे यांनी घेतलेला निर्णय आत्मघातकी आहे. संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाने निश्चित केले पण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. ज्यांनी विश्वासघात केला, थोपटे त्यांच्याकडेच जात आहेत.