म्हसवड : म्हसवड शहराला सध्या पालिकेकडून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले असून दुषीत पाणी पिल्यामुळे शहरातील अनेकांना गँसस्ट्रो सह विविध आजार जडु लागले आहेत, यामुळे मात्र शहरातील सर्वच दवाखाने फुल्ल झाल्याचे चित्र असून पालिकेने यावर त्वरीत उपाययोजना करावी अशी, जोरदार मागणी शहरवासीयांतून होत आहे.
म्हसवड शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून जिवन प्राधिकरणाच्या या योजनेतून शहराला दररोज पाणी पुरवठा केला जातो, मात्र पावसाळा सुरु झाला की पालिका हा पाणीपुरवठा बंद करुन पालिकेने अधिग्रहण केलेल्या विहिरीतुन शहराला पाणी पुरवठा करीत आहे, विहिरीचे पाणी हे दुषित असल्याने ते पाणी पिल्यामुळे नागरीकांना त्याचा त्रास होत आहे, त्यामुळेच शहरात गँसस्ट्रो सारखे आजार पसरत आहेत, तर पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शहरात डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
सध्या पालिकेकडुन शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्याचा थेट परिणाम पाणी साठवलेल्या भांड्यावर होऊ लागला आहे, तर हे पाणी हिरवट असे दिसत असल्याचे नागरीकांकडून सांगितले जात असून ते पाणी पिल्यानेच त्रास होत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. सध्या पालिकेकडुन होत असलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ येत असल्याने पोट फुगणे, पोटात गँस पकडणे, तहान न भागणे, उलट्या, जुलाब , मळमळ याबरोबरच पोटाचे अनेक विकार नागरीकांना जडु लागले आहेत याला पालिकेचे दुषीत पाणीच कारणीभुत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना त्वरीत राबवुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी एकमुखी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
[read_also content=”विनायक मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला : नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/with-the-death-of-vinayak-mete-a-struggling-leader-has-been-lost-nana-patole-nrdm-315960.html”]
पाण्याला हिरवट रंग –
सध्या पालिकेकडुन शहराला पुरवठा होत असलेल्या पाण्याला हिरवट असा रंग दिसत असुन हे पाणी फिल्टर न करता विहीरीतुन थेट पाण्याच्या टाकीत सोडले जात असावे व तेथुनच ते नागरीकांना नळ कनेक्शन द्वारे सोडले जात असल्याचा आरोप नागरीकांतुन व्यक्त होत आहे.
दोन दिवसांत शहराला स्वच्छ पाणी देणार – मुख्याधिकारी
म्हसवड शहराला सध्या पालिकेकडुन होत असलेला पाणी पुरवठा हा काहीसा दुषीत असल्याच्या नागरीकांच्या मला ही तक्रारी आल्या असुन त्या तक्रारी येताच मी त्यावर त्वरीत उपाययोजना सुरु केल्या आहेत, दोन दिवसांत शहराला पुर्वीप्रमाणे स्वच्छ पाणी देणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सांगितले.