साताऱ्यातील पाचगणी या पर्यटन स्थळी डान्स बार आणि हॉटेल वाढले असून पोलिसांची कारवाई सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
मेढा : दत्तात्रय पवार : दोन दिवसांपूर्वी पाचगणी शहराच्या जवळ असलेल्या खिंगर येथे एका हॉटेलमध्ये बारबाला नाचवण्याचा प्रकार घडला व यावर पाचगणी पोलिसांनी कारवाई केली. पाचगणी शहरालगत असलेल्या छोट्या-छोट्या खेडेगावांमध्ये आलिशान हॉटेल उभी राहिली आहेत. अशा हॉटेलमधून ‘छम छम’चा आवाज वाढू लागला आहे. त्यातीलच खिंगर गावात पाचगणी पोलिसांनी (Maharashtra Police)ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पाचगणी थंड पण आजूबाजूची गावेच गरम झाली असून हा प्रकार “चाय पेक्षा किटली गरम” अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. यात पाचगणी पर्यटन (Travel) स्थळाची नाहक बदनामी होत आहे.
पाचगणी पर्यटन स्थळ देशभरात नावाजलेले पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील टेबल लँड पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. यासह विविध पॉईंट व निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पर्यटकांना नेहमी खुणावत असते. आता अलीकडच्या काळात पाचगणी शहराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या-छोट्या खेड्यांमध्ये अनेक हॉटेल्स उभी राहिली आहेत. यापैकीच खिंगर हे एक गाव. खिंगर गावच्या चारी दिशांना डोंगर-दऱ्या आहेत. अशा निसर्गाच्या सानिध्यात अनेक बाहेरील व्यावसायिकांनी येथील जमीनी खरेदी करून मोठमोठे हॉटेल्स उभे केले आहेत. तर काही स्थानिकांनी आपापल्या जागेत हॉटेल उभी केली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शहरापासून बाजूला हा भाग येतो त्यामुळे या भागात अनेक हॉटेल्समध्ये बारबाला नाचवण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. शांत एकांत परिसर असल्याने पुणे-मुबंईचे आंबटशौकीन शेठ लोक या भागात रहायला येऊन आपले असे शौक पूर्ण करतात. यापूर्वी देखील खिंगर येथे पोलीस प्रमुख समीर शेख असताना मोठी कारवाई करण्यात आली होती. तर दोनच दिवसांपूर्वी खिंगर येथीलच वर्षा व्हीला हॉटेलमध्ये बारबाला नाचत जवळपास १८ लाखांची कारवाई पाचगणी पोलिसांनी केली आहे. त्यामुळे एकंदरीतच पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी शहर नाहक चर्चेत येत आहे.
पोलिसांची जबाबदारी वाढली
पाचगणी शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये असे हॉटेल उभे राहिल्याने येथील शांततेचा गैरफायदा घेत अशा बारबाला नाचवण्याचे व आपले शौक पूर्ण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पाचगणी पोलिसांची जबाबदारी आता वाढली असून पाचगणी शहराच्या आजूबाजूच्या ज्या खेडेगावांमध्ये अशी हॉटेल्स उभी राहिले आहेत. या ठिकाणी रात्रगस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चौकट पाचगणी परिसरात अनेक व्यावसायिकांनी जागा घेऊन हॉटेल उभारले आहेत. अशा या हॉटेलमध्ये असे अनेक अवैध प्रकार घडत असल्याचे अलीकडच्या काळात समोर येत आहे.यामधील अनेक हॉटेल मालकांनी राजकीय पक्षांचा आधार घेतला आहे. राजकीय पक्षांची पदे देखील घेतलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडचणी देखील येत असल्याचे दिसून येत आहे.






