पुणे – लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. सकाळपासून मोठ्या उत्साहामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते काही लोकांना अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक गावकरी जमलेले दिसून येत आहे. हा व्हिडिओ अंथुर्णे येथील तलाठी कार्यालयामधील असल्याचे दिसत आहे. यामध्ये अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे एका व्यक्तीसोबत जोरदार भांडत आहेत. भांडताना ते अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहेत. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागणार आहे. अशा पद्धतीची विधानं दत्तात्रय भरणे करत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
“केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!” अशा कॅप्शनसह रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.