सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी वसंत माेरे यांना इशारा दिला. तसेच पीएमपीएमएलच्या महीला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चाैकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पुण्यात एका कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बाेलत हाेते.
स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेवर भाष्य करताना, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘ अशी घटना घडल्यानंतर तपास करण्यासाठी सर्वांनीच तारतम्य बाळगले पाहीजे. तपास पुर्ण हाेऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. काही जण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात, त्यांना साेडले जाणार नाही. एखादा आराेपी सापडत नाही म्हणून काय तुम्ही स्वत:च्या घराच्या काचा फाेडणार का ? स्वत:ला वेगळे काही दाखविण्याचा प्रयत्न कराल ? यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत असेल, पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून ते नुकसान भरून घेतले पाहीजे असे आदेश न्यायालयाने दिले आहे. राग प्रत्येकाला येताे, पण राग व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. अहींसेचा मार्ग आहे. आम्ही काय अव्वाच्या सव्वा करताेय आणइ त्यांच्यावर राज्याची देखभाल करण्याची जबाबदारी आली आहे, अशा उत्साहात जे काही चालले आहे. त्यांच्यावर पण कायद्याच्या चाैकटीत राहून कारवाई केली जाईल.’’
पीएमपीएमएलच्या महिला कर्मचाऱ्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या विराेधात तक्रारी केल्या आहेत, याविषयी विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘ यासंदर्भातील बातम्या मी टिव्हीवर पाहील्या आहेत. याविषयी पीएमपीएमएलच्या प्रमुखांना सुचना देऊन, त्या तक्रारीत तथ्य आहे का ? महीलांनी लेखी तक्रार केली आहे का ? केली असेल तर शहानिशा केली जाईल. खाेलात जाऊन यात काेण दाेषी असेल तर कारवाई केली जाईल.’’
आरोपी गाडेला पोलीस कोठडी
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७) याला मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे पोलिसांनी गुनाट या त्याच्या गावावरून पकडले. स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमाला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत (12 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल, कपडे व या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.