ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला
दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद सांगितले की, मागील कार्यकाळात नगरपालिकेत ठाकरे सेनेची सत्ता होती. राज्यातही त्यांचीच सत्ता होती. मात्र नागरी सुविधांबाबत आपला अजेंडा सांगण्यापेक्षा लोकांची मते भरकटवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. या उलट भाजपाकडून पंचसूत्रीच्या माध्यमातून करण्यात येणार्या विकासकामांची मांडणी जनतेसमोर केली जात आहे. एखाद्या विकासाचा प्रकल्प आणि नवीन कामांच्या प्रस्तावांची रूपरेषा भारतीय जनता पार्टीकडून जनतेसमोर ठेवली जात आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेकडून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून मते मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.
काळे म्हणाले की, २०१६ मध्ये आपण भाजपाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. त्यावेळी शहरवासीयांचा मोठा जनाशीर्वाद मिळाला होता. स्थानिक माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या २०१६ ते २०२२ पर्यंत विविध २०० प्रकरणांमध्ये तब्बल अडीचशे कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ही बाब स्थानिक लेखा परिक्षणातून समोर आली आहे. शहर खड्ड्डयात घालून जनतेचे करोडो रूपये खिशात घालणार्यांना यावेळी त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन काळे यांनी शहरवासीयांना केले आहे. भ्रष्टाचार्यांना घरी बसवा, असे आवाहनही माजी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, मधुकर तावडे, युवराज नळे, जिल्हा संघटक अॅड. नितीन काळे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मागील कार्यकाळात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी केलेल्या भ्रष्टाचारातील पाच-दहा प्रकरणांबाबत बोलायचे झाल्यास, अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी ५४ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांना पाणी पुरवठा करण्यासाठी १६ लाख रूपये खर्च केले आहेत. कोरोना काळात प्रत्येकाला जीवन महत्वाचे होते. त्या काळात अंत्यसंस्कारासाठी सरपण खरेदीपोटी प्रति मृतदेह दोन हजार रूपये खर्च असताना प्रत्येकी चार हजार रूपये असे एकूण २ कोटी ६८ लाख रूपये उचलून मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यात आले. दररोज शहरात २६० किलोमीटरचे रस्ते साफसफाईसाठी एक कोटी ४२ लाख रूपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.
दररोज २१० किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभरात एक कोटी ४६ लाख रूपयांचा खर्च दाखविला आहे. या नाल्यांतून १२ हजार टन गाळ काढला, त्यावर ५४ लाखांचा खर्च दाखविला आहे. धाराशिव शहरात तीन कोटी रूपये वृक्षारोपणावर खर्च दाखविण्यात आला आहे. वर्षभरात शहरात २५ लाख रूपयांची जंतूनाशकाची फवारणी केली आहे. ही फवारणी कुठे केली, कुणालाही माहिती नाही. कोरोना काळात साहित्य खरेदीसाठी तब्बल ९३ लाख रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याच काळात औषध फवारणीपोटी एक कोटी १७ लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा अनेक कामांमध्ये मागील कार्यकाळातील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी २४२ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.






