चौंडी नगरीत तब्बल 700 लेक-जावयांचे 'धोंडे जेवण' आणि शाही सन्मान
अहिल्यानगर / पोपट पिटेकर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे आणि पवित्र अधिक मासाचे औचित्य साधून अहिल्यादेवींची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथे एक ऐतिहासिक आणि कौटुंबिक सोहळा पार पडला. ‘धोंडे जेवण व सन्मान सोहळा’ या नावाने आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात परिसरासह विविध गावांतील तब्बल ७०० लेक आणि जावयांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती. एकाच वेळी शेकडो जावई आणि कन्यांचा सन्मान होण्याची ही चौंडीच्या इतिहासातील पहिलीच अभूतपूर्व घटना ठरली.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि समस्त चौंडी ग्रामस्थांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे नेटके आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीतील नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी संपूर्ण चौंडी नगरीला एखाद्या मोठ्या लग्नाचे स्वरूप आले होते.
फेटा, मिरवणूक आणि शाही स्वागत
सकाळी ९ वाजल्यापासूनच लेक-जावयांचे चौंडी नगरीत मोठ्या थाटामाटात आगमन सुरू झाले. आलेल्या प्रत्येक जावयाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने कपाळाला टिळा लावून आणि डोक्यावर मानाचा ‘शाही फेटा’ बांधून करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या ढणढणाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्व लेक-जावयांची गावातून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
अहियलेश्वर मंदिरात सामूहिक दर्शन व प्रतिमा पूजन
मिरवणुकीनंतर सर्व उपस्थितांनी अहियलेश्वर मंदिरात जाऊन सामूहिक दर्शन घेतले व दर्शन सोहळा संपन्न झाला. यानंतर मुख्य कार्यक्रम स्थळी म्हणजेच माणकोजीराव शिंदे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि संस्कृतीचे जतन होते,” असा सूर या वेळी उमटला.
पारंपरिक ‘धोंडे जेवणाचा’ आस्वाद आणि भेटवस्तू वाटप
दुपारच्या सत्रात ७०० लेक आणि जावयांसाठी खास पारंपरिक ‘धोंडे जेवणाचे’ आयोजन करण्यात आले होते. अगदी घरच्या मायेने आणि अगत्याने सर्व लेक-जावयांना भोजन वाढण्यात आले. भोजनानंतर या सोहळ्याची आठवण म्हणून सर्व लेक आणि जावयांना सन्मानपूर्वक विशेष भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. चौंडी ग्रामस्थांच्या या आदरातिथ्याने सर्व लेक-जावई भारावून गेले होते.
“हा केवळ एक कार्यक्रम नसून नात्यांचा उत्सव होता. चौंडीच्या इतिहासात हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा सोहळा ठरला आहे,” अशा भावना उपस्थित जावयांनी व्यक्त केल्या. हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त चौंडी ग्रामस्थांनी व तरुणांनी अहोरात्र परिश्रम घेतले.






