पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट
Ahilyanagar Crime News Marathi : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील किर्तनवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका सशस्त्र टोळीने दोन कुटुंबांवर थरारक दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात सात जणांच्या या टोळीने घरात घुसून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना चाकूचा धाक दाखवत लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या घटनेत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घरात घुसलेल्या आरोपींनी थेट कपाटांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी रावसाहेब किर्तने यांना जाग आली आणि त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज व धारदार हत्याराने हल्ला केला.
Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
किर्तने यांच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर याच टोळीने अवघ्या ८०० मीटर अंतरावर राहणाऱ्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावर हल्ला केला. येथेही आरोपींनी बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करत सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. याशिवाय, परिसरातीलच भागवत बाबुराव बटुळे व शांताराम बप्पा बटुळे यांच्याही घरात चोरी करण्याचा प्रयत्न या टोळीने केला, मात्र तो अयशस्वी ठरला. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या दरोड्याचा तातडीने छडा लावून आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. दरम्यान, खरवंडी कासार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






