सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : सातारा जावली मतदारसंघातील विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना हलक्यात न घेता पुन्हा एकदा मुळातून प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोणता द्यायचा यामध्ये अद्यापही महाविकास आघाडीत खल सुरू आहे. महाविकास आघाडीच्या हर्षल कदम यांना पाटण मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संधी दिली आहे. त्याच पद्धतीने साताऱ्यातही ठाकरे गटाला हा मतदारसंघ जाऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या दीपक पवार व अमित कदम यांच्या राजकीय आकांक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची दुसरी यादी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख ५७७८ म्हणजे एकूण मतदानाच्या ६४ टक्के मते मिळाली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पाचव्यांदा आमदार बनवण्याच्या तयारीत आहेत. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघावर त्यांची हुकमी पकड आहे. त्यामुळे साताऱ्यातून महाविकास आघाडीला उमेदवार देताना पूर्ण विचारांती द्यावा लागणार आहे. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात चांगलेच लक्ष घातले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोरल्या पवारांचा शब्द आजही प्रमाण मानला जातो, परंतु सध्या सातारा जिल्ह्यात परिस्थिती प्रतिकूल आहे. आपल्या पक्षाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी शरद पवार जंग-जंग पछाडत आहेत. साताऱ्यातील राजघराण्याविषयी पवारांना ममत्व असले तरी राजघराण्याचे वारसदार मात्र सध्या सत्तेचा रोख ओळखून भाजपमध्ये आहेत. त्या दृष्टीने पवारांनी अद्याप कोणताही उमेदवार तिथे जाहीर केलेला नाही.
सचिन मोहिते दावेदार
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटू शकतो, अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे. येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते प्रमुख दावेदार असणार आहेत. सचिन मोहिते यांनी गेल्या अडीच वर्षात सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक चेहरा अशी आपली प्रतिमा तयार केली आहे. तरीही शिवेंद्रसिंहराजे यांच्या सोबतची त्यांची लढत इतकी सोपी असणार नाही. शिवेंद्रसिंहराजेंसमोर कोण आव्हान उभे करणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.
बंडखोरी होण्याची भीती
शरद पवार राष्ट्रवादीकडून दीपक पवार व अमित कदम इच्छुक आहेत. सातारा मतदारसंघ सेनेला सुटल्यास येथे बंडखोरी होण्याची भीती आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी पवारांनाच ज्येष्ठत्वाच्या नात्याने राजकीय तडजोडी करून डॅमेज कंट्रोल करावे लागेल. अर्थात महाविकास आघाडीच्या चर्चेची गाडी काय राजकीय वळणं घेणार हा मुद्दा येथे महत्वाचा ठरेल. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना जोर लावून काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडीची दुसरी यादी अत्यंत महत्त्वपूर्ण असून ती केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे