nilesh lanke, parner
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात इंग्रजी बोलण्याच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला होता. लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांच्या साम्राज्याला धक्का देत निलेश लंके अहमदनगरचे खासदार म्हणून निवडूनही आले.विशेष म्हणजे निलेश लंके यांनी विजयानंतर थेट इंग्रजीतून शपथ घेतली आणि सुजय विखेंना चोख उत्तरही दिले.
यानंतर आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी इंग्रजीमधून बॅनरबाजी करत पुन्हा एकदा सुजय विखेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश लंके यांच्या समर्थक अर्जुन भालेकर यांनी पारनेर मध्ये चक्क इंग्रजी भाषेतून बॅनरबाजी केली आहे. “डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’ (Don’t Underestimate the Power of Common Man) असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. हे बॅनर सध्या संपूर्ण अहमदनगरमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. तर सुजय विखेंना हे चोख प्रत्युत्तर आहे अशी चर्चाही अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे असल्याचे म्हटले होते. तसेच, सुजय विखेंचा एक व्हिडीओ दाखवत, काही जण रिल्स बनवू काम केल्याचा दिखावा करतात, असा टोलाही लगावला होता. जगताप यांनी दाखवलेल्या काही व्हिडीओमध्ये विखे पाटील यांच्या संसदेतील इंग्रजी भाषणांचांही समावेश होता.
याच इंग्रजी भाषणांचा धागा पकडून सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.