(सौजन्य - नवराष्ट्र टीम)
मुंबई : पश्चिम आशियातील तणाव कायम असताना भारतातून अनेक अन्नपदार्थांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. त्याचा विशेषतः शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अन्नधान्य आणि फळांचा पुरवठा ठप्प झाला असताना अंड्यांची निर्यातही ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत अंड्यांचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत.
आखाती देशांत भारतातून अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. पण, या निर्यातीत युद्धामुळे अडचण येत आहे. परिणामी, अंड्यांच्या देशातील बाजारात किंमती उतरल्या आहेत. बंगळुरू येथील ठोक अंड्यांच्या किंमती जवळपास ७ रुपये प्रति अंड्याहून घसरून जवळपास ५ रुपये प्रति अंड्यांवर आल्या आहेत. ठोक खरेदीदार आता जवळपास ५०० रुपयांत १०० अंडे खरेदी करू शकतात. तर किरकोळ बाजारात अंड्यांच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. आता एक अंडे ५.५० ते ६ रुपये दराने विक्री होत आहे. आधी एक अंडे हे ८ ते ९ रुपयांना मिळत होते.
उद्योग जगतातील अंदाजानुसार, इराण संकट वाढण्यापूर्वी भारतातून आखाती देशांमध्ये रोज एक कोटी अंड्यांची निर्यात करण्यात येत होती. पण, आता संघर्ष विकोपाला गेल्याने वाहतुकीसह निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारात अंड्यांचा मोठा पुरवठा करण्यात येत आहे. भारतात उत्पादित जवळपास ८० टक्के अंडी आखाती देशांत निर्यात होतात. हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. तर उन्हाळ्यात अंड्यांची मागणी रोडवते. पण, आता खवय्यांना अंड्यांचे भाव घसरल्याने रोजची सोय झाली आहे. त्यांना आता रोज विविध रेसिपी करून खाता येणार आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट गडद
सुरक्षेची कारणे आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे संयुक्त अरब अमिरात, ओमान, बहरीन आणि कतार या देशांशी सुरू असलेला व्यापार पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात अंड्यांची मोठी आवक वाढल्याने अंड्यांच्या किंमती घसरल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, कुक्कुटपालन व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.






