नवी मुंबई कार्यालयात भरणार खासदारांचा ' दरबार '
सिद्धेश प्रधान,नवी मुंबई : वाशी येथे नुकतेच ठाणे नवी मुंबईचे खासदार नरेश म्हस्के यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. ठाण्यात राहणारे व नवी मुंबईत जनसंपर्क कार्यालय उघडणारे नरेश म्हस्के हे नवी मुंबईच्या राजकीय इतिहासातील पहिले खासदार बनले आहेत. एकीकडे वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जाऊन जनता दरबार घेण्याचा इशारा दिलेला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने महायुतीतील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता नरेश म्हस्के यांनी थेट कार्यालय उघडून एकप्रकारे ‘खासदार आपल्या सेवेत’ दाखवून दिले आहे. महिन्यातून काही दिवस म्हस्के नवी मुंबईकरांना वेळ देणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिकांना देखील बळ मिळणार आहे. या कार्यालयाच्या निमित्ताने भरणाऱ्या ‘ दरबारातून ‘ एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे गणेश नाईकांना या निमित्ताने शह दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असे द्वंद्व युतीतील नेत्यांमध्ये पाहायला मिळू शकते.
वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार सुरू करण्याच्या घोषणेनंतर भाजपा, शिंदे गटात टिका टिपणीस सुरुवात झाली आहे. आगामी काळात पालिका निवडणुका आहेत. प्रत्येक पक्षास स्वबळावर पालिका लढवायची आहे. आपली अडीच दशकांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी नवी मुंबईत गणेश नाईक हे स्वबळावर पालिका लढविण्यास आग्रही आहेत. कट्टर विरोधक असलेल्या शिंदे सेनेशी त्यांना युती नकोय. डोईजड झालेल्या सेनेच्या स्थानिक नेत्यांना त्यांना सत्तेचा वाटेकरी होऊन द्यायचे नाही. हे लपून राहिलेले नाही.
तर शिवसेना शिंदे गटाची देखील स्वबळाची भूमिका आहे. किंबहुना शिंदे सेनेचे देखील पारडे नवी मुंबईत जड झाले असून, पालिका निवडणुका जवळ येताच हे पारडे अधिक जड होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपाने गणेश नाईक यांना वनमंत्री करत, एकनाथ शिंदेंसमोर आव्हान उभे केले आहे. गणेश नाईकांनी देखील जनता दरबाराचा घोषणा करत पक्षाने दिलेली ‘राजकीय ‘ जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यास अनुसरून शिंदे गट देखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.
नाईकांच्या इशाऱ्यांना ठाण्यातून खा. नरेश म्हस्केनी प्रत्युत्तर दिलेले असताना, नवी मुंबईत किशोर पाटकर यांनी देखील गणेश नाईकांवर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यास गणेश नाईकांच्या कट्टर विरोधक मंदा म्हात्रेंची साथ देखील सेनेला मिळाली आहे. असे असताना आता ते नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील वाशी या शहराच्या मध्यवर्ती भागात जनसंपर्क कार्यालय सुरू करून ‘ दरबारास्त्र ‘ सोडले आहे. येथून नवी मुंबईतील स्थानिक नेतेच कारभार हाकणार असले तरी, नरेश म्हस्के यांची महिन्यांतून काही दिवस लावली जाणारी हजेरी कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरणार आहे. तर नवी मुंबईकरांच्या मनात देखील ‘ठाण्याचा खासदार झाला की नवी मुंबईतील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते ही भावना पुसण्यासाठी मदत होणार आहे. खासदारबद्दल जनमत बदलण्यास मदत होणार आहे.
वाशी सारख्या मध्यभागी कार्यालय असणे ही प्रत्येक पक्षाची इच्छा असते. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे कार्यालय वाशीत आहे. भाजपा पक्षाला अद्याप कार्यालय सुरू करता आलेले नाही. आ.मंदा म्हात्रे यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू करून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. म्हात्रेंचे कार्यालय सुरू करणे हा देखील नाईकना शह देण्याचाच प्रयत्न असल्याचे दिसून येते. त्यात गणेश नाईक व मंदा म्हात्रे यांच्या राजकीय युद्धात मंदा म्हात्रे यांना साथ देणारे बेलापुर विधानसभेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांची भक्कम साथ नरेश म्हस्के यांना मिळाली आहे. खा. म्हस्के यांचे कार्यालय सुरू करण्याची जबाबदारी घेऊन पाटकर आगामी काळात गणेश नाईकांना राजकीय प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहेत.